औरंगाबाद: ई- ऑफिस यंत्रणेत बिघाड झाल्याने आज सलग सातव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले. या आठवड्यात एकही दिवस प्रशासकीय निर्णय होऊ न शकल्याने दुष्काळात तेरावा महिना आल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात भयंकर दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने वेगाने निर्णय घेऊन कामकाज करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या आठवड्याभरापासून ई- ऑफिस यंत्रणेत बिघाड झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे.
प्रशासकीय पातळीवरील निर्णय, आदेश, अंमलबजावणी आदी कामे ई-ऑफिस यंत्रणेद्वारे केली जातात. या यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रशासकीय कामकाज जवळपास ठप्प झाले. विशेषत: ग्रामीण भागाला या ठप्प कामकाजाची झळ मोठ्या प्रमाणावर पोहोचत आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी राबविल्या जाणारी रोहयो योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना यासह अनेक योजनांना मंजुरी, प्रशासकीय आदेश यासह अनेक निर्णय ठप्प झाल्याने प्रशासन जवळजवळ पंगू झाल्यातच जमा आहे. प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांचे प्रमाणही घटले आहे. संगणकीय यंत्रणा ठप्प पडल्याने कर्मचारी हातावर हात ठेवून बसलेले दिसतात. अनेक जण तर कामे सांगून बाहेरही भ्रमंती करीत आहेत. महत्त्वाच्या महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर फायली तुंबल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी मदत, चारा छावण्या यासह महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होऊ शकत नसल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचारीही अडचणीत आले आहेत.
इकडे आड तिकडे विहीर
महसूल सारख्या महत्त्वाच्या विभागाला ई- ऑफिस बिघाडाचा मोठा फटका बसला. तातडीचे निर्णय आणि अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. मात्र, आदेशाची प्रत आणि निर्णयाची माहिती वेळेवर कर्मचाऱ्यांना पोहोचत नसल्याने अडचणीचे ठरू लागले आहे. कर्मचाऱ्यांना मात्र इकडे आड तिकडे विहीर झाल्याचे दिसते.